Farmers Protest in Jalna : धरण उशाला, कोरड घशाला! गोदावरीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

राक्षसभुवन फाट्यावर शिवसेना शिंदे गटाचे रास्ता रोको आंदोलन; दोन तास वाहतूक ठप्प
Farmers Protest in Jalna
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील राक्षसभुवन फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.Pudhari
Published on: 
Updated on: 
अकबर शेख

शहागड : गोदावरी नदीपात्रातील पाणीसाठा आटल्याने गेवराई आणि अंबड तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहागड-वाळकेश्वर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २०) शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील राक्षसभुवन फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गेवराई तालुक्यात वडीगोद्री ते गेवराईदरम्यान सुमारे दोन किलोमीटर, तर शहागड परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, राक्षसभुवन, माळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, नागझरी, आगार नांदर, गंगावाडी आदी गावांसह अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर, गोरी-गंधारी, आपेगाव, बळेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव आणि कुरण परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

नागझरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गोदावरी नदीपात्रातील शहागड-वाळकेश्वरसह इतर कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाणीपातळी घटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर उतरून चक्काजाम आंदोलन केले.

२४ तासांत पाणी सोडा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार

गोदावरी नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना गेवराई तालुकाप्रमुख बाळासाहेब खेडकर यांनी यापूर्वी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. उजव्या कालव्यातून मालेगाव नाल्यामार्गे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे, तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खराब झालेले गेट तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

तहसीलदार उशिरा दाखल झाल्याने शेतकरी संतप्त

आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार गीतांजली गरड उशिरा दाखल झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. प्रशासनाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत 'पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!' अशा घोषणा दिल्या.

बाळासाहेब खेडकर यांचा प्रशासनाला अल्टिमेटम

यावेळी शिवसेना गेवराई तालुका व्हिजेएनटी प्रमुख बाळासाहेब खेडकर यांनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला. परिसरातील १४ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, उजव्या कालव्यातून मालेगाव नाल्यामार्गे गोदावरी नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटची दुरुस्ती करून २४ तासांच्या आत पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. गरज पडल्यास शेतकरी आपल्या लेकराबाळांसह आणि गुराढोरांसह जायकवाडी प्रशासन, अभियंते तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजेश राऊत यांचीही आक्रमक भूमिका

अंबड तालुका शिवसेना संघटक तथा लोकसभा संघटक राजेश राऊत यांनीही या आंदोलनात आक्रमक भूमिका मांडली. अंबड तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शहागड येथील पैठण फाटा येथे यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाला जालना जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश काळे यांनी पाठिंबा दर्शविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.