

जालना : शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान एक धक्कादायक व गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सावरकर चौक, सिंधी बाजार परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान ओळखपत्रे बेवारस अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
११ जानेवारी २०२६ रोजी आचारसंहिता कक्षाकडे सावरकर चौक परिसरात महत्त्वपूर्ण शासकीय ओळखपत्रे कचऱ्यात टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी तात्काळ भरारी पथकास (FST) घटनास्थळी पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. भरारी पथकाचे प्रमुख डी. एन. हिवराळे यांनी पथकासह प्रत्यक्ष पाहणी केली असता कचऱ्यात अनेक नागरिकांची आधार कार्डे, पॅन कार्डे व मतदान ओळखपत्रे आढळून आली. प्राथमिक पाहणीत तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.
अतिरिक्त आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार पथक प्रमुख हिवराळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या संदर्भात आचारसंहिता नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे किंवा मतदारांच्या ओळखपत्रांबाबत निष्काळजीपणा करणे अथवा त्यांचा गैरवापर करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकिसन पांडुरंग वाघमारे करीत आहेत. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा अशा प्रत्येक तक्रारीवर २४ तासांच्या आत तातडीने कारवाई करत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.