

परतूर; पुढारी वृत्तसेवा : रेवलगाव शिवारात शेतात परतूर पोलीसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना पकडून रोख रकमेसह अटक केली. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेवलगाव शिवारात जुगार चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल केंद्रे, पोकॉ गोविंद पवार, पोकाँ चव्हाण, दीपक आढे, पोकाँ नितीन बोंडारे, पोकाँ दशरथ गोपनवाड, पोकाँ विकास घाडगे, पोकाँ विजय जाधव, आबासाहेब बनसोडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे यांच्या मार्गदर्शनखाली रेवलगाव शिवारामध्ये शेतात सायंकाळी साडपाच वाजताच्या सुमारास छापा मारला असता घटनास्थळी काहीजण झाडाखाली जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
अशोक सोनाजी काळे (रा. सालगाव), सुभाष शेषराव घायाळ (रा. रेवलगाव), गौतम सुदाम दवंडे (रा. सातोना), दिनेश बालासाहेब घायाळ (रा. रेवलगाव), प्रकाश फकीरराव बिडवे (रा. सातोना बु.) यांना रंगेहाथ पकडले. तर इतर पाच ते सहा जण पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य व नऊ हजार चारशे पन्नास रुपये रोख रक्कम आणि दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी असा दोन लाख एकोणचाळीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दीपक आढे यांच्या फिर्यादीवरून पाच जुगाऱ्यासह इतर पाच-सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.