

भोकरदन : ट्रक मिक्सर मशीन आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मामा- भाच्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.१६) भोकरदन-दानापूर रस्त्यावरील भायडी गावाजवळ घडली. मामा ज्ञानेश्वर जनार्दन भुतेकर (वय ३० वर्षे) आणि भाचा प्रसाद संतोष शेळके (वय १६ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन जुई धरण पाटीकडून देहेडकडे जात होते, तर ट्रक मिक्सर मशीन दानापूरहून जुई धरण पाटीमार्गे भोकरदनच्या दिशेने येत होते. भायडी गावाजवळ काळे यांच्या शेताजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने पिकअपमधील चौघेजण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, संभाजीनगरकडे नेत असताना रस्त्यातच गंभीर जखमी झालेल्या मामा ज्ञानेश्वर भुतेकर व भाचा प्रसाद शेळके यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋतुजा गजानन बावस्कर (वय १७ वर्षे) आणि वेदिका संजय शेळके (वय ११ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुढील उपचार छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.