

जालना : राज्याच्या पायाभूत विकासासाठी बुधवार (दि.29) आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय मराठवाड्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सोलापूर - तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज -रेल्वेमार्गाच्या सुधारित खर्चाला आणि राज्य शासनाच्या ५० टक्के निधी हिश्श्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय मराठवाड्याच्या रेल्वे दळण-वळण व्यवस्थेतील नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो, असे मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे.
डॉ. लाखे पाटील यांनी सांगितले की, खामगाव जालना धाराशिव आणि जळगाव जालना - धाराशिव हे दोन महत्त्वाचे रेल्वे मार्ग मंजूर झाल्यास, जालना आणि बीड हे 'पूर्व-पश्चिम' तसेच 'उत्तर-दक्षिण' भारताला जोडणारे रेल्वे जंक्शन बनतील. त्यामुळे मराठवाडा, विदर्भआणि वऱ्हाड या भागांचा विकास हे वेगाने होईल. जालना भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असल्यामुळे ते महत्त्वाचे केंद्र ठरते. सध्या विदर्भातील खामगाव, खान्देशमधील जळगाव आणि मराठवाड्यातील धाराशिव या दरम्यान थेट रेल्वे दुवा नाही. जर हा दुवा तयार झाला, तर औद्योगिक वाहतूक, कृषी उत्पादनांचा पुरवठा, पर्यटन आणि धार्मिक यात्रा या सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. जालना, बीड, धाराशिव आणि खामगार येथील औद्योगिक वसाहतींना थेट बाजारपेठ उलब्ध होईल.
केवळ चर्चा नको, कृतीची आवश्यकता
मराठवाड्याच्या अनुशेषावर आता केवळ चर्चा नव्हे तर कृती आणि जनतेचा दबाव आवश्यक आहे. सर्वपक्षीय खासदारांनी 'मातीशी इमान राखून' हा मुद्दा संसदेत प्राधान्याने मांडावा. 'तसेच, राज्य आणि केंद्र शासनाने खामगावजालनाधाराशिव आणि जळगावजालनाधाराशिव मार्गांचा सर्वेक्षण व मंजुरी प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचने केली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास जालना 'महाराष्ट्राचे रेल्वे हृदय' म्हणून उदयास येईल आणि मराठवाड्याचा अनुशेष इतिहासजमा होईल, असा विश्वास डॉ. लाखे पाटील यांनी व्यक्त केला.
रेल्वेमार्गाचे फायदे : विकासाचा नवा अध्याय
औद्योगिक गुंतवणुकीस चालनाः जालना, बीड, धाराशिव आणि खामगाव येथील औद्योगिक वसाहतींना थेट बाजारपेठांशी जोडणी.
कृषी व फलोत्पादन निर्यात वाढः शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन नफा वाढेल.
पर्यटनाला चालना : तुळजाभवानी, औंढा नागनाथ, पैठण, अजिंठा-वेरूळ अशा धार्मिक व ऐतिहासिक स्थळांपर्यंत सहज पोहोच.
रोजगार निर्मितीः बांधकाम आणि संचालन या दोन्ही काळात हजारो रोजगार निर्माण होण्याची शक्यता.
सामाजिक-सांस्कृतिक एकात्मताः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भयांच्यातील भौगोलिक दरी भरून काढणारा विकासाचा सेतू.