

जालना : जिल्ह्यातील ग्राहकांकडे वीजबिलाची मोठी थकबाकी असल्याने वसुलीसाठी महावितरणच्या परिमंडल कार्यालयाने थेट छत्रपती संभाजीनगरहून अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवली आहेत. या पथकांनी सोमवारी (18 ऑगस्ट) रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध भागांतील 1156 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला. या मोहिमेत वीजचोरीही पकडण्यात आली आहे. वीज चोरी प्रकरणी 81 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पथकाने सव्वा कोटीची थकीत वीज बिल वसुली एका दिवसात केली आहे.
जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर वीजबिलांची थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे विविध मोहिमा राबवण्यात येतात. मात्र थकबाकीदारांकडून वीजबिल भरण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी जालना जिल्ह्यात वीजबिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील शाखा अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदार ग्राहकाकडून एकतर वीजबिल वसूल करणे अन्यथा ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय या पथकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी (18 ऑगस्ट) रोजी जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अभियंता व तंत्रज्ञांची तब्बल 82 पथके दाखल झाली. अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता वेंकटेश पेन्सलवार, सोमनाथ मठपती यांच्या नेतृत्वाखाली या पथकांसह स्थानिक अभियंते व कर्मचार्यांनी जालना शहरातील जुना जालना, शनिमंदिर, अंबड चौफुली, काद्राबाद, सराफा गल्ली, मामा चौक, बडी सडक तसेच अंबड, शहागड, जामखेड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, मंठा व आष्टी या गावांत वीजबिल वसूल करण्यासह वीजचोरी पकडण्याची धडक मोहीम राबवली. जिल्ह्यात ही मोहीम यापुढेही छत्रपती संभाजीनगरच शहर व जिल्ह्यातील अभियंते व कर्मचार्यांची पथके जिल्ह्यातील विविध शहरे व गावांना अचानक भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले.