

Jalna News: Farmers and farm laborers alike suffer due to crop failure
भागवत पवार
बदनापूर : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. शेतात पीक नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगारावर होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नाही आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अशी विदारक परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण होत आहे.
बदनापूर तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा आधार शेती आहे. शेतकरी, शेतमजूर आणि शेतीशी निगडित विविध व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि शेतातील मजुरीवर चालतो. मात्र, नापिकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्याचा परिणाम शेतमजुरांच्या रोजगारावरही झाला आहे. शेतात पेरणीपासून आंतरमशागत, खुरपणी फवारणी आणि काढणीपर्यंत विविध कामांतून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळतो.
परंतु पावसाअभावी पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे किंवा पिकांचे नुकसान होणे यामुळे शेतीतील कामांच्या संधी कमी होत आहेत. परिणामी, अनेक मजुरांना नियमित काम मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही आणि घर चालवायचे कसे, असा प्रश्न बदनापूर तालुक्यातील ग्रामीण कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नापिकीच्या संकटाकडे केवळ शेतीचे नुकसान म्हणून न पाहता, ग्रामीण रोजगार आणि सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज
नापिकीचा परिणाम केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. शेतीत काम नसल्याने मजुरांना रोजगाराच्या शोधात इतर गावांकडे किंवा शहरांकडे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रोजगार हमीच्या कामांना गती देणे, गरजू कुटुंबांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे आणि नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांना नियमानुसार शासकीय योजनांचा लाभमिळवून देणे आवश्यक आहे.