

जालना : तालुक्यातील गोंदेगाव येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रविवारी सकाळी दगडाने ठेवलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर काही वेळेतच या तरुणाची ओळख पटली आहे.
ग्रामस्थांनी तातडीने जालना पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह अंबड तालुक्यातील पानेगाव येथील मच्छीन्द्र कोंडीबा दराडे याचा असल्याची ओळख पटली आहे. तो त्याच्या मामीचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगाव येथे आला होता.
अंत्यसंस्कार आटोपल्यानंतरही तो काल गोंदेगाव येथे नातेवाईकाकडेच थांबला होता. रविवार रात्री अचानक गायब झालेल्या मच्छीन्द्र दराडे याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला आहे. पोलीस त्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.