Jalna news: खारुळ तळ्यात बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला
विलास जाधव
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील खारुळ तळ्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह आढळून आला. रामनाथ फकीरराव भोजने (वय अंदाजे 39 वर्षे, रा. जामखेड) असे मृत युवकाचे नाव आहे. सोमवारी (दि. 12 जानेवारी) सकाळी त्यांचा मृतदेह खारुळ तळ्यात पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामनाथ भोजने हे शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) सायंकाळी सुमारे चार वाजता घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, शेतातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खारुळ तळ्याच्या काठावर त्यांची दुचाकी दिसून आली होती. त्यानंतर मोबाईल ट्रॅकिंगद्वारे तपास केला असता तळ्याच्या काठावरच त्यांचा मोबाईल, कपडे व चप्पल आढळून आले. त्यामुळे ते तळ्यात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबड व जालना येथील अग्निशामक दलाच्या मदतीने तसेच बोटीच्या सहाय्याने सलग दोन दिवस शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर सोमवारी सकाळी रामनाथ भोजने यांचा मृतदेह तळ्यात पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मृतदेह आढळून आला असला तरी तो अद्याप पाण्याबाहेर काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मृतदेह तळ्यातच पाण्यावर तरंगत आहे. याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेला माहिती देण्यात आली असून प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा घटनास्थळी आल्यानंतर पुढील आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या घटनेमुळे भोजने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

