

जालनाः जालना शहरातील जुना मोंढा भागातील गजबजलेल्या ठिकाणी गुरुवारी भरदुपारी चाळीस वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. भर दिवसा झालेल्या खुनाच्या या घटनेमुळे व्यापारी व नागरीकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना शहरातील नागेवाडी भागात बुधवारी निखील पवार या युवकाचा खून करण्यात आल्याची ताजी असतांनाच गुरुवारी अत्यंत वर्दळीच्या जुना मोंढा भागात असलेल्या हॉटेल जय माँ समोर संजयसिंग शर्मा ऊर्फ संजय सिंग सैनी या चाळीस वर्षीय इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी धारदार शस्त्राचे वार करून निघृण खून केला. या घटनेमुळे काही काळ या भागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भरदिवसा व्यापारी भाग असलेल्या वर्दळीच्या जुना मोंढा भागात झालेल्या हत्येच्या या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमधे भीतीचे वातावरण दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मयत संजयसिंग शर्मा ऊर्फ संजयसिंग सैनी याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालात शवविच्छेदनासाठी पाठविला.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असून दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी धारदार शस्त्राने वार केल्याच माहिती प्राथमिीकदृष्ट्या समोर आल आहे. पोलिस खुनाच्या घटनेमागील कारण शोधत आहेत. शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाढलेल्या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमधे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध शस्त्रे व वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे खुनाच्या घटनेनंतर वर्दळीच्य ठिकाणाहून आरोपींना पळ काढला मात्र आरोपींना पोलिसांनी पकडले.
संशयित ताब्यात
जुना मोंढा भागात वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या खुनाच्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी झालेल्या खून प्रकरणात आरोपी असलेला संजय सैनी नुकताच जामीनावर सुटला होता. त्याच प्रकरणात संजय सैनीची हत्या झाल्याचा संशय आहे.