Jalna Catch the Rain campaign : 'कॅच द रेन' अंतर्गत जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करा

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलकवच अभियान
Jalna Catch the Rain campaign
Jalna Catch the Rain campaignpudhari photo
Published on
Updated on

जालना : संभाव्य एल-निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शासनाच्या 'कॅच द रेन' व 'जालना जलकवच अभियान २०२६' अंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रविवारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जालना महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत मार्गदर्शन केले.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि निश्चित कालावधीत पूर्ण करावयाच्या सात प्रमुख कृती कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. एल-निनोमुळे अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट तसेच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Jalna Catch the Rain campaign
Jalna Crime : हॉटेलाच्या आड चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त; गुन्‍हा दाखल

अभियानांतर्गत जलपंचायत व पाणी वापर संस्था (WUA) स्थापन करणे, प्रत्येक घर व शासकीय इमारतींवर रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था उभारणे, प्रत्येक नगरपंचायत व नगरपालिकेत किमान २०० आणि महानगरपालिकेत किमान ५०० जलतारा व शोषखड्डे तयार करणे, लोकसहभागातून तलाव गाळमुक्त करणे, वनराई व अनकट दगडी बंधारे उभारणे, विहीर पुनर्भरण व भूमिगत बंधारे निर्माण करणे तसेच पिकांच्या पद्धतीत आवश्यक बदल करणे या सात प्रमुख उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.

जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रशासनासोबत लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, प्रत्येक नागरिकाने पाणी बचत व जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.

Jalna Catch the Rain campaign
Chhatrapati Sambhajinagar water supply : पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर शेवटची डेडलाईन

बैठकीस जालना महानगरपालिकेचे महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सहाय्यक आयुक्त, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनीषा दांडगे, नगर प्रशासनाचे सहआयुक्त गवळी आणि नायब तहसीलदार डॉ. नीलम लुणावत यांचीही उपस्थिती होती.

पाणी अडवा, पाणी जिरवा अभियानाला प्रारंभ

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 'पाणी अडवा, पाणी जिरवा' अभियानाला तत्काळ सुरुवात करण्यात आली. जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी आपल्या शेतातील नैसर्गिक उताराच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने १० बाय १० फूट आकाराचा जलसंधारण खड्डा खोदून अभियानाचा प्रारंभ केला. "एकत्र येऊ, जल वाचवू; प्रशासन आणि समाजाच्या संयुक्त प्रयत्नातून जालना जिल्हा जलसुरक्षित बनवू," असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news