

Jalna is an orphan because Guardian Minister Munde is not giving time!
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे निर्माण झालेल्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे अत्यंत गंभीर आणि भयावह चित्र यात मांडले आहे. दिवसाढवळ्या होणारे गुन्हे, सातत्याने घडणारे खून, अवैध धंद्यांची वाढ यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून एक दिवस जालन्यासाठी द्यावा अथवा जिल्ह्यात पाच सत्ताध-ारी आमदार असून त्यापैकी कुणाही एकाला मंत्रिमंडळात घेऊन जालन्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख, अशोक पडूळ आणि अॅड. शैलेश देशमुख यांनी पाठविलेल्या निवेदनात पालकमंत्री पंकजा मुंडेंचे जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष अधोरेखित करण्यात आले आहे. जनतेशी संवाद, तक्रारींची दखल, दिव्यांग, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेटी यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पाच आमदार असताना, मागच्या दरवाजातून मंत्रिपद मिळालेल्या व्यक्तींना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यास आमचा आक्षेप नसला तरी त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेळ न देणे आणि प्रशासकीय संवाद टाळणे ही जनतेची दिशाभूल असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्यात क्रीडा, महसूल, आरोग्य, शिक्षण, पोलिस प्रशासन आणि विविध सरकारी विभागांमध्ये मरगळ दिसत आहे. भ्रष्ट प्रवृत्तींचे वर्चस्व वाढले असून, शासन-प्रशासन सर्वसामान्यांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी सलग सात महिन्यांपासून रस्त्यावर लढा देत आहेत. मात्र, पालकमंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नांची अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि शांततापूर्ण आंदोलनांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आल्याची तीव्र नाराजीही यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या उदासीनतेचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटू शकतो, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
प्रलंबित समस्या सोडवा
जिल्ह्याच्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत, पालकमंत्री यांनी महिन्यातून किंवा पंधरा दिवसांतून किमान एक दिवस जिल्ह्यात वेळ द्यावा, प्रलंबित जनसमस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात यावेत तसेच पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्यासाठी वेळ देणे शक्य नसल्यास जालना जिल्ह्यातील पाच सत्ताध-ारी आमदारांपैकी एका आमदाराला मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्यावर जालन्याचा पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.