Jalna illegal slaughterhouses | तीन अवैध कत्तलखाने जमीनदोस्त
illegal slaughterhouses destroyed in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरातील मंगळबाजार भागात असलेल्या तीन अवैध कत्तलखान्यांवर मंगळवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत तीन कत्तलखाने जमीनदोस्त केले. या कारवाईस विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जालना शहरात गोमातेची कत्तल करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्यावतीने सदर बाजार पोलिस ठाण्यात आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजबांधव पोलिस ठाण्यात जमा झाले होते. आरोपींना गणेश विसर्जनापर्यंत अटक न झाल्यास गणेश विसर्जन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. आरोपीविरुध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जालना महापालिकेतही धाव घेऊन तेथे शहरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते.
त्यानंतर महापालीकेच्या आयुक्तांनी अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश प्रभारी स्वच्छताप्रमुख कैलाश चांदणे यांना दिले होते. त्यांनतर मंगळवारी सकाळी महापालिकेच्या २ जेसीबी, ५ ते ६ ट्रॅक्टर व शंभर कर्मचाऱ्यांनी मंगळबाजार परिसरातील तीन अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केले. त्यात एक कत्तलखाना हा गोमातेचा व्हिडिओ काढून तो प्रसार माध्यमांवर टाकणाऱ्या आर ोपीचा होता. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोमवारी रात्री दगडफेकीची घटना
जालना शहरातील वलीमामु दर्गा परिसरात रात्री दोन गटांत दगडफेकीची घटना पडली. त्यात काही बाहनांच्या काचा फुटल्या, सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित कारवाई केली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी सीसीटीव्ही पाहून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
अलर्ट होणे गरजेचे
जालना शहरात गणेशोत्सवामधे घडणा-या अशा प्रकारच्या घटनांमुळे शहराची शांतता व सुव्यवस्था ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस प्रशासनाने अलर्ट होणे गरजेचे आहे.

