

जालना : शहरातील जुना जालना भागात असलेल्या आदित्यनगरात अज्ञात चोरट्यांनी पिराजी बाजाबा मिसाळ यांचे बंद घर फोडून 4 लाख 48 हजारांचे दागिने व 2 लाख रुपये रोख असा 6 लाख 48 हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिराजी मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते मुलगा,पत्नीसह पुणे येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले असताना 19 फेब्रुवारी त्यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याचा फोन त्यांचा पुतण्या दादासाहेब मिसाळ याने केला. त्यांच्या सांगण्यावरून पुतण्या काकासाहेब यांने कडी उघडून घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता स्वयंपाकघरातील लाकडी कपाटाचे तसेच वरच्या मजल्यावरील बेडरूममधील दोन लोखंडी कपाटांचे लॉक तोडण्यात आलेले दिसले.
चोरट्यांनी कपाटातील सुमारे 4 लाख 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण 6 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले.या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.