

जालना : भर उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असताना जालना जिल्ह्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च २०२६ च्या भूजल सर्वेक्षण अहवालानुसार, जिल्ह्याच्या सरासरी भूजल पातळीत मागील पाच वर्षाच्या तुलनेत सुमारे १.०१ मीटरने सुधारणा झाली आहे. ही वाढ भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ११० निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असून, यामध्ये सरासरी पातळी ८.३४ मीटरवरून ७.३३ मीटरवर आली आहे. तांत्रिकदृष्ट्या भूजल पातळी कमी होणे म्हणजे पाणी जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ येणे, जो सकारात्मक संकेत मानला जातो. जिल्ह्यातील ३७ विहिरींमध्ये पाणी पातळीत मोठी वाढ दिसून आली आहे, तर ३९ ठिकाणी काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली असली तरी जिल्ह्याची एकूण सरासरी समाधानकारक आहे.
तालुनिहाय आकडेवारी पाहता, अंबड तालुक्यात सर्वाधिक १.४८ मीटरची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बदनापूर, जालना आणि मंठा तालुक्यातही जलस्थिती सुधारली आहे.
गेल्या हंगामात झालेला चांगला पाऊस आणि जिल्ह्यात राबवण्यात आलेली जलसंधारणाची कामे यामुळे ही पाणी पातळी वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भूजल पातळीतील ही सुधारणा उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार असली, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि वॉटर रिचार्ज सारख्या प्रकल्पांवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.