Jalna Crime : मुदतबाह्य बिस्किटे विकणाऱ्या जालन्यातील दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा!

शासकीय कार्यक्रमात मुदतबाह्य अन्नपदार्थ वाटप; अन्न सुरक्षा विभागाकडून ९,६०० रुपयांचा माल जप्त
Jalna Crime : मुदतबाह्य बिस्किटे विकणाऱ्या जालन्यातील दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा!
Published on
Updated on

जालना : मृद व जलसंधारण विभागाच्या एका शासकीय कार्यक्रमात मुदतबाह्य (एक्सपायर्ड) बिस्किटे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा विभागाने तात्काळ कारवाई करत नवीन मोंढा परिसरातील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, ९ हजार ६०० रुपयांचा मुदतबाह्य साठा जप्त केला आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेले 'क्रिस्पी अँड क्रंची स्वीट अँड सॉल्ट क्रॅकर'चे खोके मुदतबाह्य असल्याचे समोर आले. यानंतर अन्न सुरक्षा विभागाने टाकलेल्या धाडीत एकूण ९,६०० रुपये किमतीचे १६ खोके जप्त करण्यात आले आहेत.

कार्यक्रमासाठी व्यवस्थापक संतोष क्षीरसागर यांनी मे. भाग्यश्री ट्रेडर्सकडून बिस्किटांचे ५ खोके खरेदी केले होते. प्रत्यक्ष वाटपादरम्यान एका खोक्यातील बिस्किटे मुदतबाह्य असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तांबे यांनी तात्काळ भाग्यश्री ट्रेडर्सच्या दुकानाची तपासणी केली.

तेथे अतिरिक्त साठा न आढळल्याने अधिक चौकशी केली असता, हा माल नवीन मोंढा येथील 'मे. संजरी ट्रेडिंग कंपनी'कडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने संजरी ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून तेथून मुदतबाह्य बिस्किटांचे १६ खोके जप्त केले.

कडक कारवाईचा इशारा

"शासकीय कार्यक्रमात मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मे. भाग्यश्री ट्रेडर्स व मे. संजरी ट्रेडिंग कंपनीवर 'अन्न सुरक्षा व मानके कायद्या'नुसार कारवाई सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल."

— निखिल कुलकर्णी, साहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news