

भोकरदन : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला पकडून भोकरदन पोलिसांनी ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे भोकरदनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, सिल्लोडकडून भोकरदनकडे आयशर ट्रक (क्र. R.J.09.G.E.7411) मधून बंदी असलेला सुगंधित पानमसाला विक्रीसाठी आणला जात आहे.
सदर बातमीची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिल्लोड ते भोकरदन रोडवरील साईप्रसाद हॉटेलजवळ सापळा रचला. संशयित आयशर ट्रक येताना दिसताच पोलिसांनी पाठलाग करून तो थांबवला. वाहनाची झडती घेतली असता त्यात ‘राजनिवास’ सुगंधित पानमसाला आणि ‘ZN-1 जाफरानी जर्दा’ तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
यावेळी जप्त केलेला मुद्देमाल
राजनिवास सुगंधित पानमसाला:१४,६२५ पुडे (किंमत ₹२१,९३,७५०/-),ZN-1 जाफरानी जर्दा तंबाखू१४,६२५ पुडे (किंमत ₹१४,६२,५००/-),आयशर ट्रक (R.J.09.G.E.7411): (किंमत ₹२५,००,०००/-),एकूण जप्त मुद्देमाल: रुपये६१,५६,२५०/- चौकशीदरम्यान वाहनचालकाने हा गुटखा भोकरदन येथील फिरोज खान मेहमूद खान याला पुरवण्यासाठी नेला जात असल्याचे सांगितले.
या कारवाईनंतर अन्न व औषधी प्रशासन विभाग, जालना यांना माहिती देण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी विनोद किष्टु ओसावार यांच्या तक्रारीवरून १) विद्याराम श्यामलाल कश्यप (वय ४६, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) आणि २) फिरोज खान मेहमूद खान (रा. भोकरदन, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक तेंघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल बांगर, पोउपनि प्रकाश शेळके, सागर शिंदे, प्रशांत उबाळे, शिवाजी जाधव, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, शरद शिंदे, इंदल बमनावत, रानगोते, संतोष बनकर आणि चरणसिंगल यांच्या पथकाने केली.