

Bhokardan ITI Theft
भोकरदन : भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अज्ञात चोरट्याने वर्कशॉप आणि कार्यालयाचे कुलूप उघडून कपाटातील सुमारे ५९ हजार २३ रुपयांचे शैक्षणिक व तांत्रिक साहित्य लंपास केले. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास आयटीआयमधील वर्कशॉप व कार्यालयात चोरी झाल्याचा अंदाज आहे. संस्थेचे शिक्षक मनोज दिनकरराव भिवसनकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता वर्कशॉपमधील विविध ट्रेडचे साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले.
चोरट्याने आयटीआयमधील विविध महत्त्वाचे साहित्य लंपास केले आहे. त्यामध्ये ३ जारचा मिक्सर (८,९१८ रुपये), फायर एक्स्टिंग्विशर (८,४९६ रुपये), कॉपर केबल व पीव्हीसी कॉपर वायर (१५,८०० रुपये), तीन फेज केडब्ल्यूएच एनर्जी मीटर दोन नग (१२,८८० रुपये) आणि ड्रिल मशीन (३,९०० रुपये) यांचा समावेश आहे.
याशिवाय वायर बंडल, ट्रान्सफॉर्मर, हॅमर, इलेक्ट्रिक नाईफ, निऑन टेस्टर, प्लायर, सिझर ब्लेड यांसह इतर साहित्यही चोरीस गेले आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ५९ हजार २३ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, चोरीची माहिती सुरक्षा रक्षक उमरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संस्थेतील कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पोलिसांना माहिती दिली. भोकरदन पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.