

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धेतून भोकरदन तालुक्यात गुप्त धनासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. या प्रकारामुळे भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? यामागे कोणाचा हात आहे? याचा शोध पोलिसांनी घेत भोंदूबाबाला अटक केली आहे. (Jalna Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश लोखंडे (रा. धामणगाव) या भोंदूबाबाने तुझी मुलगी माझीच आहे, ती मला द्या, अन्यथा पाच ते दहा लाखांचा मानहानीचा दावा करेन, अशा धमक्या देत त्रास दिल्याने ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०, रा. वालसा वडाळा) या तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृताच्या पत्नीने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांच्या पथकाने दोनच तासांत भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला भोकरदन न्यायालयाने १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
आरोपी भोंदूबाबाची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी धामणगाव (ता. बुलढाणा) येथे एक जुने बंद स्थितीत असलेले घर विकत घेतले होते. या घरात गुप्तधन असल्याची माहिती मिळाली होती. म्हणून मी मागील एक ते दीड वर्षापासून घरात जमिनीमध्ये इलेक्ट्रिक ब्रेकरच्या साह्याने खोदकाम करत होतो. गुप्तधन बाहेर काढण्यासाठी एक पायाळू जन्मलेल्या मुलीची नरबळी देण्यासाठी गरज होती. ज्ञानेश्वर आहेर यांची मुलगी पायाळू जन्मल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे मी आहेर याच्या मुलीचा नरबळी देऊन गुप्तधन बाहेर काढणार होतो.
दरम्यान, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव, सुरेश ढोरमारे व इतर जणांनी आरोपीला घेऊन थेट धामणगाव गाठले. धामणगाव येथील घराचा पंचनामा केला. या ठिकाणाहून इलेक्ट्रिक ब्रेकर व एक पुस्तक पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.