Jalna Accident: ऑटो रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक; एकाचा मृत्यू

चार जण गंभीर जखमी
Jalna Accident
मयत शिवाजी निर्मळPudhari
Published on
Updated on

भोकरदन : भोकरदन-जाफराबाद मार्गावरील विरेगावजवळ बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये ११ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

मृत युवकाची ओळख शिवाजी राजू निर्मळ (वय २१, रा. गोद्री, ता. भोकरदन) अशी झाली आहे. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, शिवाजी निर्मळ, सागर रमेश निकाळजे (वय २१, रा. गोद्री) आणि भगवान प्रल्हाद गावंडे (वय २०, रा. कोळेगाव, ता. भोकरदन) हे तिघेही गट्टू बसविण्याचे काम करून मोटारसायकल वरून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, विरेगावजवळ समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षा क्रमांक एमएच-२०-ईके-७९९५ सोबत त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकल आणि रिक्षाचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात मोटारसायकल चालक शिवाजी निर्मळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सागर निकाळजे, भगवान गावंडे, रिक्षाचालक प्रकाश विठ्ठल खमाणट (वय ३५, रा. छत्रपती संभाजीनगर) तसेच त्यांचा मुलगा जीवन प्रकाश खमाणट (वय ११, रा. छत्रपती संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती शिवाजी निर्मळ यांना मृत घोषित केले. गंभीर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मृत शिवाजी निर्मळ यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गोद्री गावात शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news