जालना : बैलाच्या गोठ्यावर मटण शिजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत कुदळ आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील जामखेड येथे बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी घडली आहे. "मी यापूर्वीही अनेकदा जेल भोगून आलो आहे, माझ्या नादाला लागलास तर जीवे मारून टाकीन," अशी धमकीही आरोपीने दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील रहिवासी कोंडीराम विठ्ठल पवार (वय ३१, रा. जामखेड, ता. अंबड) हे ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गावातीलच गणेश भोजणे यांच्या बैलाच्या गोठ्यावर नाथा खवाटे यांच्यासोबत मटण शिजवत बसले होते. यादरम्यान, कोंडीराम यांनी त्यांचा भाऊ अमोल काशिनाथ पवार याला दारू आणण्यासाठी पैसे देऊन पाठवले होते.
काही वेळाने आरोपी अमोल काशिनाथ पवार हा आपल्या दोन अनोळखी साथीदारांना घेऊन गोठ्यावर आला. "तू आमच्या बैलाच्या गोठ्यावर कसा काय आलास? तुला ही काय मटण शिजवायची जागा आहे का?" असा जाब विचारत आरोपींनी कोंडीराम पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपी अमोल पवार याने कोंडीराम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जवळच पडलेली कुदळ उचलली आणि कुदळीच्या लाकडी मुठीने कोंडीराम यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर व बोटांवर जोरदार प्रहार केला. तसेच सोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कोंडीराम यांच्या डोळ्याजवळ, कानावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दोन्ही मांडीवर काठीने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली.
गदारोळ ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेले दत्ता खंडागळे व नाथा खवाटे यांनी तातडीने मध्यस्थी करत आरोपींच्या तावडीतून कोंडीराम यांची सोडवणूक केली.
जेल भोगून आलोय, जिवाने मारीन
मारहाणीनंतर ‘मी बरेच वेळा जेल भोगले आहे, तू कुठेही भेटला तर तुला जीवे मारेन,’ अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. या प्रकरणी पीडित कोंडीराम पवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात आरोपी अमोल काशिनाथ पवार व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस हवालदार अनिल चव्हाण या घटनेचा पुढील तपास करत आहेत.