

Include Dhangar Samaj in ST otherwise march at Mumbai
जालना, पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात येत्या आठ दिवसांत समावेश न केल्यास सरकार विरोधात मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जेवढी माणसे असतील त्यापेक्षा मेंढर असतील असा इशारा धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे हे उपोषण करीत आहेत. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना बोऱ्हाडे म्हणाले की, जालना शहरात निघालेल्या इशारा मोर्चातून सरकारला संदेश मिळाला आहे. त्यामुळे सरकारने धनगरांचे आंदोलन हे हलक्यात घेऊ नये.
आपण येथे उपोषणास बसलो असलो तरी अडीच ते तीन कोटी धनगर समाजबांधव आपल्या पाठीशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत समाजाला शब्द दिला होता. तो देवाभाऊंनी पाळावा. आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी समाजातील लोकांची बैठक घेण्यात येणार असून आर-क्षणाची मागणी मान्य न झाल्यास मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जेवढी माणसे असतील त्यापेक्षा अधिक मेंढरं असतील, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले.