

Illegal sand mining in Godavari riverbed
शहागड : पुढारी वृत्तसेवा
अबंड तालुक्यातील आपेगाव गोदावरी नदीपात्रात पाणी नसल्याने सध्या मोठ्या प्रमाणात वाळू दिसत आहे. हिरडपुरी ता. पैठण येथे वाळूचे डेपो टेंडर चालू आहेत. त्याचा फायदा घेत आपेगाव गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचे टेंडरच आपेगाव येथील स्थानिक नागरिकांना हाताशी धरुन तस्करांनी चालू केले होते. यापूर्वी आपेगाव गावात अशी प्रकरणे घडली आहेत.
25 एप्रिलच्या मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोडरच्या साह्याने वाळू भरत असताना तहसीलदार विजय चव्हाण यांना गुप्त बातमी मिळाली. त्यांनी महसूल पथकासह गोंदी पोलिसांशी संपर्क साधला. महसूल गोंदी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उपशांवर अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरले जात असलेले तब्बल सहा हायवा ट्रक ज्यात प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू अशी एकुण 36 ब्रास वाळूसह हायवा ट्रक तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.
तहसीलदार चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच, काही हायवा ट्रक वाळूने भरलेली व भरणारी लोडर ट्रॅक्टर चालक-लोकेशन घेणारे मालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे काही हायवा घटनास्थळीच जागीच पकडण्यात आले आहेत.
अवैध वाळू उपशाला स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणात आपेगावचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही गोपनीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तहसीलदार चव्हाण यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आळा घालण्यासाठी हि कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
ही कारवाई तहसीलदार विजय चव्हाण, उपनिरीक्षक इब्राहिम शेख, जमादार रामदास केंद्रे, जमादार गणेश मुंडे, पो.का.अविनाश पगारे, तलाठी बाळासाहेब सानप, लिपीक शाम विभूते यांनी केली.