

Identifying poor and extremely poor families; information to be gathered through public participation
जालना, पुढारी वृत्तसेवाः उमेद अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जालना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून गरीब व अतिगरीब कुटुंबांचा शोध घेण्यासाठी सावरगाव हडप येथे दि. १४ व १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम पार पडले.
या उपक्रमांतर्गत दि. १५ ऑगस्ट रोजी गावातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. गटाबाहेरील महिलांनी स्वयं-सहाय्यता गटांमध्ये सहभागी व्हावे, तसेच महिलांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
यानंतर ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत गावातील सामाजिक समस्या, त्यावरील उपाययोजना आणि गावाच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या समन्वयातून गावाचा नकाशा तयार करण्यात आला. तसेच शिवार फेरी काढून शिवार नकाशा तयार करून विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
तालुका व्यवस्थापक राजू राठोड यांनी गावातील गरीब व अतिगरीब कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना स्वयं सहाय्यता गटांमध्ये सहभागी करून घेणे, नवीन गटांची स्थापना करणे आणि महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक गौतम प्रधान यांनी केले.
प्रशिक्षणास श्याम राठोड, सुदाम राठोड, सागर तायडे विठ्ठल काकडे, जया तुरुकमाने, अनिता भिसे, सुवर्णा खजिनदार, उषा पवार, पार्वती मस्कर, मीरा सातपुते यांच्यासह रामनगर व मौजपुरी प्रभागातील सर्व ग्रामसखी, आदर्श महिला ग्रामसंघ, सावरगाव येथील कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, बचतगटातील महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लखपती दीदी उपक्रमासाठी आर्थिक मदत
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून 'लखपती दीदी' बनविण्यासाठी आर्थिक मदत अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तालुका अभियान व्यवस्थापक गणेश तिडके यांनी दिली. महिलांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार व उत्पन्नवाढीच्या संधींचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.