

Maratha Reservation Movement
वडीगोद्री : हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. आम्ही लढून ते मिळवलं आता ते न्यायालयात टिकवणे, व न्यायालयात वकील उभे करणे, सुनावणी घेणे हे सरकारने करावे. हैदराबाद गॅजेटला काही झाले, तर १९९४ चा जीआरही एका झटक्यात रद्द होईल. त्यामुळे सरकारने या प्रश्नाला प्राधान्य द्यावे. असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सरकारने अलिकडेच स्पष्ट केले होते की, कुणबी नोंदी असलेल्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. यावर जरांगे पाटील म्हणाले, “हे खरं आहे. पण हैदराबाद गॅजेटमधील कुणबी नोंदींचे काय? त्या आधारावर मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. अन्यथा सरकारला सुट्टी मिळणार नाही. हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी आहे.
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा दर्शवला आहे. “बंजारा समाज हा मेहनती, शांतताप्रिय असून तो गावाशी घट्ट जोडलेला आहे. त्यांच्या जर नोंदी असतील, तर गरीबांच्या लेकराला न्याय मिळायलाच हवा, असेही ते म्हणाले.
बंजारा समाज हा गावाशी निगडित राहणारा, मेहनती व शांतताप्रिय समाज आहे. ते हसत-खेळत तांड्यांवर राहतात, ऊसतोडणी, शेती, मजुरी करून उदरनिर्वाह करतात. कधी कोणाच्या अध्यात-मध्यात नसतात, विनाकारण विरोध करत नाहीत. जर त्यांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये असतील, तर त्या गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळायलाच हवा.
गाव आणि तांडा यांचे समीकरण कायमच मजबूत राहिले आहे. मराठा आणि बंजारा हे गावपातळीवर एकत्र आहेत. काही दिवसांची नाराजी आली तरी ती दूर होते. गावातील लोकं एकत्र जेवतात, हसतात-खेळतात, आणि त्याच ऐक्यावर मराठा समाज नेहमी उभा राहील. गरीब ओबीसी ही मान्य करतात की, मराठ्यांच्या नोंदी जर गॅजेटमध्ये आहेत, तर त्यांना आरक्षण मिळायला हवे. सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये असलेल्या नोंदी मान्य कराव्यात. गावपातळीवर यामुळे खेळीमेळीचे वातावरण कायम राहील आणि समाजांमध्ये तणाव निर्माण होणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही जिल्ह्यांमध्ये सामाजिक कटुता वाढल्याचे विधान केले होते. त्यांनी सांगितले होते की, वंजारी समाजाच्या दुकानात मराठा जात नाही आणि मराठ्यांच्या दुकानात वंजारी समाज जात नाही. यावर प्रत्युत्तर देताना मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले.आम्हाला गावपातळीवर अशी परिस्थिती दिसली नाही. चार-दोन टवाळखोर सोडले तर बाकी समाज एकमेकांत एकवटलेला आहे. राजकारणाला कटुता दिसते, पण गावात माणसांना प्रेम आणि एकोपा दिसत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.