

Heavy rains in Bhokardan Anwa area cause major decline in Kharif crop production
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात यावर्षी पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे खरिपातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच मजुरीसह सोंगणीसाठीचा इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहेत.
आन्वा परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने मोठा फटका बसला असून त्याचा विपरीत परिणाम मका व सोयाबीन पिकांवर झाला आहे. यंदा सोगणीचा हंगाम लवकरच सुरू झाला असून त्यामुळे मजूर वर्गदेखील कामाला लागला आहे. खरीप हंगामात लागवड झालेले मका व सोयाबीन बहुतांश ठिकाणी काढणीला आले आहेत. शेतकरी मजुरांची जुळवाजुळवीत करीत आहे.
या हंगामात मका व सोयाबीन सोंगणीचा दर सहाशे ते आठशे रुपयांपर्यंत मजुरी वाढल्याने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान सोंगणी व सुडी लावून देण्याच्या कामासाठीही तेवढेच पैसे मोजावे लागत आहे. या वर्षी परतीच्या अतिवृष्टी पावसाने अक्षरशः पिके होते की, नव्हते अशी परिस्थितीत करून टाकली असून त्यातच एकाच वेळी अनेक शेतकरी सोंगणीच्या कामात असल्याने मजुरांची कमतरता भासते, ज्यामुळे मजुरीचे दर वाढले असून सोयाबीन कापणीचे दर वाढले आहेत. मजूर ६०० ते ८०० रुपये रोजंदारीवर सौदे करण्याचा आग्रह करीत आहेत. यावर्षी ओला दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची मोठे नुकसान झाले असून उत्पादनातही घट निर्माण झाली आहे.
सध्या सोयाबीनचे दरही कमी आहेत. त्यामुळे केलेला खर्च तरी मिळतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आहे. ऐन सोंगणीच्या तोंडावर परतीच्या अवकाळी व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यांची चांगलीच फजिती झाली. खराब झालेले सोयाबीन सोंगणीला मजूर मिळेना.
सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा परतीचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविल्याने यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी परिसरात सर्वत्र एकाच वेळेस येत असल्याने मजुरांची चांगलीच कमतरता भासते. ऐन वेळेवर मजूर मिळणे कठीण झाले आहेत.