Jalna News : महापालिकेच्या ९९३ पदांच्या आकृतिबंधास शासनाची मंजुरी

आजी - माजी आमदारांचे पदभरती मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याचे दावेप्रतिदावे
Jalna News
Jalna News : महापालिकेच्या ९९३ पदांच्या आकृतिबंधास शासनाची मंजुरीfile photo
Published on
Updated on

Government approves staffing structure for 993 Municipal Corporation posts

जालना, पुढारी वृत्तसेवाः महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती तसेच सेवांचे नियमन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६' या नियमांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार ९९३ पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदभरतीसाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

Jalna News
Water supplied : नवीन योजनेतून चार जलकुंभांत पाणी

दरम्यान, महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर शासनाने ११ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ९९३ पदांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. राज्यातील महानगरपालिकांचे वर्गीकरण आणि त्यानुसार महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आकृतिबंधाच्या आधारे जालना महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२६ तयार करण्यात आले.

जालना शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ४५७ (३) अन्वये शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या नियमांना शासनाने मंजुरी दिली आहे. शासन निर्णयात परिशिष्ट १ ते ४ सह 'जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६' यांना मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याने कर्मचारी भरतीचा शासनाने निर्णय घेतल्याने नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.

Jalna News
Crime News : डिलिव्हरी बॉयला मारहाण करत लुटले

पद भरतीची प्रक्रिया लवकरच करणार

जालना शहर महानगर पालिकेत सध्या विविध संवर्गातील जवळपास ४७५ कर्मचारी कार्यरत आहेत. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रता पडताळून पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पदोन्नती देण्याची प्रक्रिया जालना मनपातर्फे राबविण्यात येणार असून त्यानंतर लिपिक, कनिष्ठ अभियंता, वर्ग-४ यासह अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेद्वारे भरली जाणार असल्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. तर लवकरच विविध पदांची नियमानुसार भरती होऊन महानगरपालिकेचा कारभार सुरळीत होईल व नागरिकांची विकास कामे होण्यास मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. जालना शहर आणि ग्रामीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news