

जालना ः जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, दि. 11 रोजी भाजीपाला आणि फळांची मोठी आवक पाहायला मिळाली. विशेषतः पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक समाधानकारक असली, तरी लसूण आणि आल्याच्या दरातील तेजी कायम असल्याने गृहिणींच्या खिशाला फोडणी बसत आहे. लसणाचे भाव प्रतिक्विंटल 9 हजार रुपयांवर पोहोचले असून आल्याने 5800 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आजच्या बाजारभावात पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीची मोठी आवक झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल कमाल 600 रुपये तर मेथीला 700 रुपये दर मिळाला. दुसरीकडे, उन्हाळ्याचा जोर वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत असून, लिंबाला 5000 ते 9000 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे.
बाजार समितीत कांद्याची 198.7 क्विंटल आवक झाली असून त्यास सरासरी 700 रुपये दर मिळाला. बटाट्याचीही 128.6 क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी 700 रुपये दर मिळाला आहे. हिरव्या मिरचीचे दर 4000 रुपयांपर्यंत पोहोचल्याने तिखटपणा वाढला आहे.
फळांच्या बाजारात आंब्याचा गोडवा
फळबाजारात फळांचा राजा असलेल्या आंब्याची 289 कॅरेट आवक झाली. आंब्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला असून कमाल भाव 2400 रुपयांपर्यंत गेला आहे. कलिंगड आणि टरबूज यांसारख्या उन्हाळी फळांनाही चांगली मागणी असून त्यांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. चिकूच्या दराने 1800 रुपये सरासरी गाठली आहे.