Jalna News : तालुक्यात दुष्काळामुळे फळबागा करपू लागल्या

लाखोंची गुंतवणूक धोक्यात, बागा जगविण्याचे मोठे आव्हान
Fruit Orchards Drying
घनसावंगी : पाण्याअभावी तालुक्यातील मोसंबीची फळबाग करपू लागल्या आहे. (छाया : अविनाश घोगरे)
Published on: 
Updated on: 

घनसावंगी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा घनसावंगी तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात बसत असून, आता दुष्काळाची झळ फळबागांनाही सोसावी लागत आहे. वर्षानुवर्षे मोठ्या कष्टाने, लेकरांप्रमाणे जपलेल्या फळबागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. हिरव्यागार झाडांवर सुकलेली पाने, खुंटलेली वाढ आणि कमी होत चाललेला पाणीसाठा असे चित्र अनेक शेतशिवारांत दिसू लागले आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फळबाग लागवडीचा मार्ग स्वीकारला. आंबा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ यांसारख्या फळपिकांची लागवड करून शाश्वत उत्पन्नाचे स्वप्न पाहिले. मात्र, फळबाग उभी करणे ही एक-दोन दिवसांची प्रक्रिया नसते. रोपांची लागवड केल्यानंतर अनेक वर्षे त्यांची निगा राखावी लागते.

Fruit Orchards Drying
Jalna Municipal Corporation : पाणीटंचाई, बीओटी प्रकल्पावर महापौर, उपमहापौरांचा प्रशासनाला जाब !

खते, औषधे, ठिबक सिंचन, मजुरी, छाटणी आणि पाण्याची व्यवस्था यासाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर झाडे बहरतात आणि उत्पादन सुरू होते. अशा वेळी पाण्याअभावी बागांवर संकट येणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आणि मानसिक आघात ठरत आहे.

यंदा पावसाने दिलेली ओढ आणि पावसातील अनियमितता यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. विहिरी, बोअरवेल आणि शेतातील पाणीसाठे आटत चालल्याने फळझाडांना आवश्यक तेवढे पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही.

पाण्याअभावी झाडांची पाने पिवळी पडणे, फांद्या सुकणे, फळांची वाढ खुंटणे आणि झाडांची जोमदार वाढ थांबणे अशा समस्या निर्माण होत आहेत. ठिबक सिंचनाची व्यवस्था असूनही पाणीसाठाच उपलब्ध नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Fruit Orchards Drying
Goa Shirgaon Mining Economic Environmental Loss|खाणकामामुळे शिरगावला अर्थकारणाचा फटका

शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून द्यावी. तसेच फळबागा जगविण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

फळबागा उभ्या करण्यासाठी अनेक वर्षे मेहनत आणि मोठा खर्च केला. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. लेकरांप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यांदेखत सुकत असल्याने मोठे दुःख होत आहे. शासनाने फळबागा वाचविण्यासाठी तातडीने मदत करावी.

अरविंद घोगरे, शेतकरी, मच्छिंद्रनाथ चिंचोली

दुष्काळी परिस्थितीचा फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक वर्षे मेहनत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या फळबागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. प्रशासनाने तातडीने फळबागांचे सर्वेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावेत.

अशोक हेमके, मराठवाडा युवा अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.