

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये जूनचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची पेरणी रखडली आहे. विशेषतः मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला लागतात. मात्र यंदा 7 जून उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने जमीन कोरडी ठाक आहे. मिरचीचे रोप तयार करून ठेवलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. रोपवाटिकेत रोपे तयार आहेत, पण पाणी नसल्याने लागवड करता येत नाही. उशिरा लागवड झाली तर उत्पादनावर थेट परिणाम होणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की, बियाणे, रोपे, मशागत यावर आधीच हजारो रुपये खर्च झाले आहेत. आता पाऊस लांबल्याने दुबार खर्चाचे संकट उभे राहिले आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून रोपे जगवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण तो खर्चिक आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
यंदा वेळेत पाऊस न आल्यास खरीप हंगामच वाया जाण्याची भीती आहे. दरम्यान, या संदर्भात शासनाने नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
एप्रिल महिन्यात मिरची पिकाची लागवड केली आहे. मिरची पिकाला पाणी कमी पडत असल्याने मिरची सुकत आहे. विहीर, कुपनलिका कोरड्या पडल्या आहे. यामुळे विकतचे पाणी घेऊन मिरची पिकाला टाकावे लागत आहे. पाऊस लवकर न झाल्यास मिरची पीक हातचे जाऊ शकते.
संजय तायडे, शेतकरी
यावर्षी वेळेवर पाऊस पडेल या अशेवर शेती मशागतीचे काम पूर्ण करून घेतली आहे. नऊ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. यामुळे यावर्षी खरीप हंगामाची पेरणी लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.
विजय बोर्ड, शेतकरी