

Fifth Day (Panchami): Crowds gather for a glimpse of Matsyodari
अंबड, पुढारी वृत्तसेवा: अंबड येथील आदिशक्ती श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी पाचव्या माळेनिमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिराच्या पायऱ्यांवर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू होती. नवस फेडण्याच्या विविध परंपरांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
नवरात्र महोत्सवात पाचव्या आणि सातव्या माळेला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यादृष्टीने देवस्थान संस्थान आणि पोलिस प्रशासनाने यात्रेच्या नियोजनासाठी विशेष तयारी केली आहे. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून, रहाटपाळणे आणि मनोरंजनाची विविध साधने उभारण्यात आली आहेत.
देवस्थान संस्थानच्या वतीने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रा सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी संस्थानच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
अंबड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सुमारे ७० विद्यार्थी यात्रेदरम्यान सेवा देत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा सुरळीत ठेवण्यासह गर्दीचे नियोजन करण्यासाठी हे विद्यार्थी सहकार्य करत आहेत. गुरुवारी मंदिराच्या संपूर्ण पायऱ्यांवर भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
शनिवारी सातवी माळ आणि रविवारी सुटी असल्याने या दोन्ही दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देवस्थान संस्थान आणि पोलिस प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन व भाविकांच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
६० हजार नारळ फोडले
पाचव्या माळेला मत्स्योदरी देवीच्या दर्शनासोबतच नवस फेडण्याच्या परंपराही भाविकांकडून श्रद्धेने पार पाडण्यात आल्या. मंदिराच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडणे, दिवा लावणे, तसेच लहान बालकांना उंचावरून झोळीत टाकून नवस फेडणे, अशा विविध परंपरा पार पाडण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले. गुरुवारी दिवसभरात तब्बल ६०० बालकांचे नवस फेडण्यात आले, सुमारे ६० हजार नारळ फोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.