

Farmers will get pending sugarcane bills soon
घनसांवगी, पुढारी वृत्तसेवा :
"शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी जाईल, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस वाया जाणार नाही. बाहेरील कारखान्यांकडे गेलेल्या उसाचे प्रलंबित बिल लवकरच मिळेल. एकाही शेतकऱ्याचा एकही रुपया डुबणार नाही," अशी ठाम ग्वाही आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी दिली.
जनसंपर्क कार्यालयात ऊस नियोजनाबाबत आमदार हिकमत उढाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या उस गाळपाच्या समस्या, साखर कारखान्यांकडील प्रलंबित बिले तसेच आगामी हंगामासाठीचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. ऊस वेळेत गाळपासाठी जात नसल्याने होणारे आर्थिक नुकसान, तोडणी व वाहतुकीतील अडचणी, तसेच साखर कारखान्यांकडील थकीत बिलांबावत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
काही शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांकडे उस पाठवूनही बिले प्रलंबित असल्याची समस्या मांडली. दरम्यान, बैठकीदरम्यान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजहिताच्या कार्यासाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीस शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्या व सूचनांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ऊस गाळप वेळेत पूर्ण करू
चालू हंगामातील अनुभवाच्या आधारे पुढील वर्षासाठी अधिक प्रभावी व नियोजनबद्ध व्यवस्था उभारण्यात येत आहे. अतिरिक्त साखर कारखाने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असून, त्यामुळे ऊस गाळप प्रक्रिया अधिक सुरळीत व वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास आ. उढाण यांनी व्यक्त केला.