

Farmers struggle to survive leopard threat
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरी तेहतीस केवी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बेलगाव फिटरअंतर्गत सुरू असलेल्या रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे रुई, बैलगाव, भार्डीसह तांड्यासह गावातील शेतकरी सध्या अक्षरशः जीव मुठीत धरून शेती करत आहेत. एकीकडे एमएसईबीकडून रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा दिला जात असताना, दुसरीकडे परिसरात बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. "एमएसईबीला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का?" असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
रुई गावामध्ये मागील महिन्यापूर्वी बिबट्याने दोन गाईंवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे, मोटार चालू करणे, पाणी देणे हे सर्व कामे जीवावर बेतणारी ठरत आहेत. अशा परिस्थितीतही बेलगाव फिटरवरून रात्रीच वीजपुरवठा दिला जात असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने अंधारात शेतात जावे लागत आहे.
सुखापुरी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत
येणाऱ्या बेलगाव फिटरचा कारभार सध्या शेतकऱ्यांच्या संतापाचा विषय ठरला आहे. दिवसाच्या वेळेत वीजपुरवठा अपुरा, अनियमित किंवा बंद ठेवला जातो आणि रात्री अचानक वीज दिली जाते, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या परिसरात रात्री वीज देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रुईसह परिसरातील अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात एकटेच जात आहेत. मोबाईल टॉर्च, काठी किंवा साधनांच्या आध-ारावर अंधारात शेतात वावरावे लागत असल्याने भीतीचे वातावरण आहे. महिलाशेतकरी आणि वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे. "पिके वाचवायची की जीव वाचवायचा?" असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एमएसईबीकडे ठाम मागणी केली आहे की, बेलगाव फिटरवरील वीजपुरवठा रात्री न देता दिवसाच्या वेळेत द्यावा. दिवसा वीज मिळाल्यास शेतकरी सुरक्षितपणे शेतीकाम करू शकतील, तसेच बिबट्याच्या हल्ल्याचा धोका टाळता येईल.
शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला गेला नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल करत रुई परिसरातील शेतकरी आता एकत्र येऊन आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेतही मिळत आहेत.