अंबड, पुढारी वृत्तसेवा : येथील पंचायत समिती परिसरात नवजात मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथील पंचायत समिती परिसरातील गेट क्र. २ च्या बाजूला शनिवारी स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आले. कुठल्यातरी अज्ञात महिलेने जालना बीड रोड वरील अंबड पंचायतसमितीच्या गेट क्र. २ चा बाजूला टाकुन दिले असावे असा अंदाज आहे.
अंबड पोलिसांना अज्ञात व्यक्तीने फोन द्वारे याबाबत माहिती दिल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर अर्भक कपड्यात गुंडाळलेले होते. पोलिसांनी अर्भक अंबड येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर अर्भक हे जालना येथील जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचे शवविच्छेदन करून अंबड पोलिसांच्या अर्भक ताब्यात देण्यात आले. अंबड पोलीस स्टेशनने अंबड नगर परिषदेला लेखीपत्र देऊन याबाबत कळविले. त्यानंतर अर्भकाचा अत्यविधी करण्यात आला.
या प्रकरणी जमादार विष्णू चव्हाण यांनी अज्ञाता विरुद्ध फिर्याद दाखल करुन गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.