वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : "समाज बांधव मला विनंती करत होते की मी उपोषण करू नये. मात्र मी त्यांचे मन बदलले. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. मात्र मला असं वाटते कोट्यवधी लोक जगले पाहिजेत माझ्या सारखा एक मेला तरी चालेल. माझे बलिदान दिलं तरी चालते; पण समाज मोठा झाला पाहिजे. त्यासाठी परत एकदा उपोषण करू असं मी ठरवले आहे. २० जुलैपासूनचे उपोषण कठोर असणार असल्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज ( दि. १४) केला.
माध्यमांशी बाेलताना जरांगे-पाटील म्हणाले, आपल्या उपोषणाने सरकार शहाणे झाले तर ठीक, अन्यथा आपण मुंबईला कधी जायचे. येथे बैठक कधी घेयचे हे ठरवू. 20 तारखेनंतरच्या बैठकीबाबत अंतिम निर्णय घेवून भूमिका स्पष्ट केली जाईल. अल्टीमेटम संपल्यानंतर सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
धनगर समाजाला वाटते एसटीतून आरक्षण मिळालं तर आपल्या लेकरांना आणखीन सुविधा मिळतील. या आरक्षणामध्ये हे काही खाऊ देत नाही. त्यामुळे त्यांचा आग्रह तिथे आहे, छगन भुजबळ यांनी गोरगरिबांना एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळ यांनी सामान्य धनगर बांधवांचा असा उपयोग करून घेऊ नये, आणि स्वतःचा राजकीय फायदा उचलू नये. मराठा आणि धनगर कधी वैर नव्हतं आणि छगन भुजबळ यांनी आमचे वैर लावू नये. असेही ते म्हणाले.
शंभूराजे देसाई सरकारचे काम सुरू आहे जरांगे पाटील यांनी संयमाने घ्यावे असे विधान केले होते यावर बोलताना जरांगे -पाटील म्हणाले की, "मला माझ्या समाजासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. एक महिन्याचा वेळ दिला होता. या महिन्यात काय झालं काय केलंय हे आमच्या लक्षात आल आहे. आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे कळालं. बाकी आम्ही तुम्हाला दोष देत नाही आणि देऊन उपयोग ही नाही,आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली, आम्ही संयम बाळगलेला आहे."