

वडीगोद्री : पती महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा आणि आरोपींना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी गेल्या २१ महिन्यांपासून लढा देणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी कुटुंबीयांसह अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी त्यांनी जरांगे पाटील यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा घेतला.
गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. "माझी मुख्यमंत्र्यांशी भेट व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आणि पुढील लढ्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आले आहे," असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेटीनंतर सांगितले. या भेटीनंतर मुंडे कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी आपल्या प्रमुख मागण्या मांडणार आहेत. त्यांनी सांगितले की, "आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत की, येत्या आठ दिवसांच्या आत सर्व आरोपींना अटक करावी." तसेच "या प्रकरणाचा पूर्वी तपास केलेले पोलीस निरीक्षक साबळे आणि पंकज कुमावत यांना या गुन्ह्यातील सर्व आरोपींची आणि घटनेची सखोल माहिती आहे. त्यामुळे त्यांचा विशेष तपास पथकात (SIT) समावेश करावा."
"माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी पतीच्या न्यायासाठी लढत राहीन. गेल्या २१ महिन्यांत आम्ही भोगलेल्या वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे," असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. गुरुवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.