

भोकरदन : नगर परिषद निवडणुकांदरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग मतदारांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. भोकरदन येथील प्रभाग क्रमांक ५ मधील कुमारी वैष्णवी अनिल जाधव आणि प्रभाग क्रमांक ७ मधील आशितोष अनिल जाधव या दोघांनीही दिव्यांग असूनही आवश्यक सुविधा न मिळाल्यामुळे मतदानाचा हक्क बजावणे कठीण झाले. एकाचा तर मतदानाचा हक्कच हिरावला गेला.
कुमारी वैष्णवी जाधव यांच्या मतदान ओळखपत्रावर दिव्यांग असल्याची स्पष्ट नोंद असतानाही मतदान केंद्रावर व्हीलचेअर, रॅम्प किंवा अगदी साधी खुर्चीही उपलब्ध नव्हती. त्यांच्या भावाला त्यांना उचलून जिल्हा परिषद शाळा (पोस्ट ऑफिस) येथील केंद्र क्रमांक २ वर घेऊन जावे लागले. मतदानाच्या वेळीही त्यांना टेबलावर धरूनच मतदान करावे लागले. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना घरपोच मतदानाची सुविधा देण्यात आली होती; मात्र यंदा ती सुविधा पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली.
आशितोष अनिल जाधव या दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मतदाराला तर मतदान करताच आले नाही. प्रभागातील फेरबदलामुळे त्यांचे नाव प्रभाग क्रमांक ७ मध्ये टाकण्यात आले आणि मतदान केंद्र जिल्हा परिषद उर्दू शाळा, भोकरदन येथे नोंदवले गेले. हे केंद्र त्यांच्या घरापासून अत्यंत दूर असल्याने त्यांना तिथे नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले. मागील निवडणुकांप्रमाणे त्यांनाही घरपोच मतदानाची सुविधा मिळावी म्हणून त्यांनी संबंधित बीएलओ शर्मा यांच्याशी संपर्क साधला; मात्र “वरून आदेश नाहीत” असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर ERO यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनच उचलला नाही, अशी माहिती आशितोष यांनी दिली.
या निष्काळजीपणामुळे अनेक दिव्यांग मतदार मतदान करू न शकल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दिव्यांगांचा संवैधानिक मतदानाचा अधिकारच हिरावला जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.