Jalna Schocking News| पडीक घरात नवजात शिशूचा मृतदेह; देऊळगाव राजातील संजय नगर परिसरात खळबळ

जन्मताच पोटच्या गोळ्याला बेवारस सोडल्याचा संशय; पोलिसांकडून तपासाला वेग
Jalna Schocking News
Jalna Schocking News| पडीक घरात नवजात शिशूचा मृतदेह; देऊळगाव राजातील संजय नगर परिसरात खळबळFile Photo
Published on
Updated on

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहरातील संजय नगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका पडीक घराच्या परिसरात नवजात शिशूचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप, हळहळ आणि विविध चर्चांना उधाण आले आहे.

पडीक घरात आढळला नवजात शिशू

संजय नगर परिसरातील एका जुन्या व पडीक घराजवळ नवजात शिशूचा मृतदेह असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ देऊळगाव राजा पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून नवजात शिशूचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

नवजात शिशूला कोणी आणून टाकले?

हा नवजात शिशू नेमका कोणाचा आहे? त्याचा जन्म कुठे झाला? पडीक घराच्या परिसरात त्याला कोणी आणून सोडले? तसेच या घटनेमागे नेमकी काय परिस्थिती आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील उपलब्ध माहिती, संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तसेच रुग्णालयातील प्रसूतीच्या नोंदींच्या आधारे पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित केली जात असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे संजय नगरसह संपूर्ण देऊळगाव राजा शहरात हळहळ व्यक्त होत असून, नवजात शिशूला अशा अवस्थेत सोडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नवजात शिशूच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news