

वडीगोद्री पुढारी वृत्तसेवा : २६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून १ वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला वर्षभर का लागला. गोरगरीब लेकरांचे प्रश्न का मार्गी लावला जात नाही. आमच्या लेकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही टाहो फोडतोय. गरीब मराठ्यांना किती राबावे लागते, आमची पोरं डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. असं सांगत आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते अंतराळीसाठी येते पत्रकारांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, कालच माझ्याकडे एक अर्ज आला. पुण्यातील वाघोलीतल्या कॉलेजनं एका मुलीला पत्र लिहून अद्याप मुलींना मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाली नाही असं कळवले. कोल्हापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षानेही पत्र देऊन मुलीचा प्रवेश रद्द करू नये असं कॉलेजकडे मागणी केली आहे. हा इतका बोगस प्रकार आहे. आमच्या हक्काचं आरक्षण दिले जात नाही असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दिलेले आरक्षण टिकणारं नाही. ते आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. ५० टक्क्यावरचं आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण मागतोय. १८८४ पासून आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. एसईबीसी च्या अंतर्गत पोरांनी प्रवेश घेतले. आता त्या लाखो पोरांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळत नाही. आता कॉलेज १०० टक्के फीस मागायला लागलेत असा आरोप त्यांनी केला.
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय म्हणून मराठे शांत बसले आहेत. आरोपी सुटले तर आम्ही रस्त्यावर येऊ. असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.