

Declare a drought in Ghansawangi Taluka
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकरी व पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे याच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिके सुकू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, अनेक गावांमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने सोयाबीन, कापूस व तूर या पिकांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे. तसेच पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली.
पाण्याची उपलब्धता नसलेल्या गावांमध्ये तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत. ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमीची कामेही त्वरित सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सुरेशराव उगले, अर्जुनराव माळोदे, शिवाजीराव पवार, परमेश्वरराव सोनवणे, सदाशिव यादव, गणेश गुजर, पंढरीनाथ काळे, विष्णुपंत गोरे, लक्ष्मणराव काटे, महादेव माहीते, संदीप काळे, मावली चव्हाण, नामदेव भोसले, किरण सुराशे, कैलास माने, विष्णू मोरे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाअभावी पशुधन, पिण्याचे पाण्याचा प्रश्न
पावसाअभावी शेती, पशुधन, पिण्याचे पाणी आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन घनसावंगी तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली