Jalna contractual salary verification health checkup- सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी; कंत्राटी वेतनाची पडताळणी महिनाभरात पूर्ण करा

contractual salary verification and health checkup- रवी रामू कलोसे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे मनपा प्रशासनाला निर्देश
jalna
जालनाः राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे आढाव बैठकीत महापालिका प्रशासनाला सफाई कर्मचा-यांच्या विविध योजनाबाबत निर्देश दिले. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त अंजली शर्मा, उपायुक्त नंदा गायकवाड, केशव कानपुडे इतर कर्मचारी उपस्थित होते. (छाया: किरण खानापुरे)
Published on: 
Updated on: 

जालना : सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या वेतन, पदोन्नती आणि निवासाच्या प्रश्नांपर्यंत सर्वच बाबींमध्ये प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि कालमर्यादित कार्यवाही करावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य स्वी रामू कलोसे यांनी जालना महानगरपालिका प्रशासनाला दिले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत कलोसे यांनी जालना महानगरपालिकेला मंगळवार, दि. १७ रोजी भेट देत जालना महानगरपालिकेतील भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आढावा बैठकीत स्थायी व अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, सेवाविषयक स्थिती, आरोग्य सुविधा, वेतन, सुरक्षा व्यवस्था आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, नगरसचिव केशव कानपुडे, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी धर्मा खिल्लारे, सिटू संघटनेचे पदाधिकारी मधुकर मोकळे, हरिश्चंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोदेकर, निवासी पोलिस उपअधीक्षक श्री. इंगोले, जालना शहर महानगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक गणेश बत्तीन, स्वच्छता विभागाचे सुधीर डहाळेकर, विभागाचे प्रमुख राहुल देशमुख, नगर अभियंता सय्यद सउद, पाणीपुरवठा अभियंता तायडे, मालमत्ता विभागाचे राजेश चंदनशिवे संगणक विभागाचे आनंद मोहिदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कलोसे म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, सर्व कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या तपासणीमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीवर विशेष भर द्यावा, असे निर्देश कलोसे यांनी दिले.

तसेच सेप्टिक टैंक स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लागू किमान वेतनाच्या तरतुदींनुसार वेतन मिळणे आवश्यक आहे. हे वेतन थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. वेतन वितरणात कोणतीही अनियमितता होत नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी आणि समितीचा अहवाल एका महिन्यात सादर करावा, असे निर्देश कलोसे यांनी यावेळी दिले. बैठकीच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी आणि सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा परिचय करून सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.

नमस्ते योजना सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवा

'नमस्ते' (NAMASTE) योजनेची माहिती पात्र सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या सात दिवसांत व्यापक प्रचार व जनजागृती करावी. कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि आरोग्यपत्रिका तयार करून जास्तीत जास्त पात्र कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.