

Contracted ambulance drivers have not been paid for four months
अप्पासाहेब खर्डेकर
जालना : जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील गर्भवती रुग्णांना आरोग्य केंद्रातून घरी आणि घरातून आरोग्य केंद्रात ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या चार महिन्यांत वेतन न मिळाल्याने रुग्णवाहिका चालकांना कर्ज काढून घर चालवावे लागत आहे.
याबाबत कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, १०२ च्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते अडचणीत सापडले आहे.
वेतनासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाना प्रथमोपचार देण्यात येतात. मात्र. गंभीर रुग्णांना ग्रामीण, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. तसेच गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठी १०२ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेतून पाठविले जाते. या आरोग्य केंद्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात ८१ कंत्राटी चालक नियुक्त करण्यात आले आहेत. थकित मानधन तसेच वाहन चालकांचे मानधन, पीएफ, ईएसएसआयसी, विमा रक्कम वेळेवर भरणे, जिल्ह्यातील रुग्णवाहिका ही चालकांच्या इतर मागण्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
थकीत मानधन तत्काळ अदा करावे, पीएफ ईएसआसी, विमा रकमेचा त्वरित भरणा करावा, कर्मचाऱ्यांना प्रति माह वेतन अदा करून पगार-पत्रक द्यावे, रुग्णवाहिका चालकांच्या मानधनामधील तफावत दर करावी.