

भोकरदन ः शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असे असतानाच, आता पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. भोकरदन शहरातील पेशवे नगरसह विविध प्रभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांना चक्क अळ्या आणि जंत मिश्रीत, दुर्गंधीयुक्त पिवळ्या रंगाचे पाण्याचा पुरवठा झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, घराघरांमध्ये पोटाचे विकार आणि साथीच्या आजारांनी पाय पसरले आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहे. गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी पाणी भरताना पात्रात लहान-लहान पांढऱ्या व काळ्या रंगाच्या मृत अळ्या तरंगताना आढळल्या.
शहरातील मुख्य बाजारपेठ, शनिवार बाजार परिसर, आणि अंतर्गत वस्त्यांमध्येही अशाच अळीयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याचे समोर आले. नाल्याचे पाणी मिसळल्या असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनास सूचना - पालिकेचे मुख्याधिकारी गजानन तायडे व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अजय व्यवहारे या दोघांच्याही सदरील बाब लक्षात आणून दिली आहे. त्वरित उपाययोजना करून स्वच्छ व निर्मळ पाणीपुरवठा नळाद्वारे करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.