

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा–जानेफळ या मुख्य रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, या मार्गावरील खड्डे, चिखल आणि पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा चिंचखेडा गावापर्यंत बंद करण्यात आली असून बस केवळ चौफुलीपर्यंतच येत आहे. परिणामी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.
चिंचखेडा-जानेफळ या मार्गावरील एसटी सेवा बंद झाल्याने चिंचखेडा व परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज चौफुलीपर्यंत पायी जावे लागत आहे. पावसाळ्यात चिखल, पाण्याने भरलेले खड्डे आणि घसरडा रस्ता यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. खराब रस्त्याचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शेतकरी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांनाही बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीतही या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शिक्षणाचा मूलभूत अधिकार असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण होत असून त्यांच्या उपस्थितीवर आणि शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान तातडीने थांबवावे.
बस पुन्हा सुरू करा
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन चिंचखेडा–जानेफळ रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी. तसेच एसटी बस सेवा पुन्हा चिंचखेडा गावापर्यंत नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक, पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
या रस्त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, एसटी बस सेवा बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा.
मोठेबा सरोदे, रहिवासी चिंचखेडा