

शहागड; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी दुपारी धुळे सोलापूर महामार्गावर एक तास रास्तारोको करून निषेध करण्यात आला. शनिवारी आमदार गोपीचंद पडळकरवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त ओबीसी बांधवाकडून व धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली.
धुळे-सोलापूर महामार्गावर ओबीसी बांधव व धनगर समाजा च्या बांधवानी रस्त्यावर येऊन वाहने थांबवून एक तास रास्ता रोको केला या दरम्यान एकच छंद गोपीचंद, भ्याड हल्ला करणाऱ्याना तात्काळ अटक करावी, एकच पर्व ओबीसी सर्व अश्या घोषणा देण्यात आल्या. एक तासानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना मागणीचे निवेदन देऊन रास्ता रोको थांबवण्यात आला. या एक तासाच्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्याभ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथील धनगर समाज व ओबीसी बांधवाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी वडीगोद्री व धाकलगाव बाजार पेठ,हॉटेल,दुकान बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदी पाथरवाला बु.कुरण येथील ओबीसी समाज बांधवाच्या वतीने धुळे -सोलापूर महामार्गांवरील गोंदी फाटा येथे सकाळी ठीक 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.सर्व ओबीसी प्रवर्गातील बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.