

जालना: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीची सत्ता येणार असून जालना महानगरपालिकेवर दोन तृतीयांश बहुमताने भाजपाचाच महापौर निवडून येईल, असा ठाम विश्वास महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
रविवार (दि. ४) रोजी जालना येथील भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी भाजपाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीला जनतेचा कौल मिळणार आहे. जालना महापालिकेतही भाजप भक्कम बहुमताने सत्ता स्थापन करेल. यासोबतच सोमवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “२५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असूनही उद्धव ठाकरे मुंबईला पुढे नेऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री असताना ते फक्त दोन वेळाच विधिमंडळात व मंत्रालयात आले. आज जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यांवर प्रश्न विचारला असता, बावनकुळे म्हणाले की, “मित्रपक्षावर जाहीरपणे टीका करणे योग्य नाही. बैठकीत जे ठरते त्याला सर्वांनी बांधील राहिले पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत,” असा सल्लाही त्यांनी दिला.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
सोमवार दि. 5 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी दिली.