Bhokardan agriculture : तालुक्यात मका पिकाच्या कोळपणीच्या कामांना वेग

भोकरदन : दोन दिवसांपासून पावसाने दिली उघाड
Bhokardan agriculture
भोकरदन : मका पिकात कोळपणी करताना शेतकरी. (छाया : रवींद्र देशपांडे)
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या शेतीकामांना मोठी गती मिळाली आहे. सुरुवातीला झालेल्या पेरण्यांनंतर पावसाने ओढ दिली होती, मात्र नुकत्याच झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसानंतर जमिनीला वाफसा आल्याने तालुक्यात मक्याच्या पिकात कोळपणीच्या (डवरणीच्या) कामांना वेग आला असून बळीराजा शेतीकामात पूर्णपणे व्यस्त झाला आहे.

भोकरदन परिसरात मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या मक्याचे पीक कोळपणीच्या अवस्थेत आले आहे. पिकातील तण काढण्यासाठी आणि पिकाला मातीचा भर देऊन त्याची वाढ जोमाने व्हावी यासाठी शेतकरी कोळपणीला प्राधान्य देत आहेत.

Bhokardan agriculture
Goa Farmers | मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला

शेतात दोन बैलांच्या जोडीने डवरे/कोळपे चालवून मक्याच्या दोन ओळींमधील गवत साफ केले जात आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे माती मऊ झाली असल्याने ही कामे सुलभ होत आहेत.

सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, ऐन वेळेवर आलेल्या दमदार पावसामुळे मका, कापूस , सोयाबीन , तुर यांसारख्या पिकांची स्थिती सुधारली आहे. मक्याची कोळपणी वेळेत झाल्यास पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते, असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Bhokardan agriculture
Belagavi farmers: शेतकऱ्यांना प्रतीक्षा दमदार पावसाची

सध्या ग्रामीण भागात सर्वत्र सकाळी लवकरच शेतकरी बैलांच्या जोड्या घेऊन शेताकडे निघताना दिसत असून, मजुरांच्या साहाय्याने कोळपणीसोबतच खुरपणीच्या कामांनाही वेग आला आहे. या पावसामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून या पुढील काळात पाऊस वेळेवर आल्यास यंदा उत्तम पिकाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news