

भोकरदन : सोलापूर-जळगाव रेल्वेच्या मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला (मावेजा) लाटण्याच्या हव्यासापोटी काही भूमाफियांनी आणि स्वार्थी घटकांनी चक्क सिनेमाच्या सेटप्रमाणे रातोरात नकली घरे उभी केल्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच समोर आला आहे.
केवळ नावापुरते सिमेंटचे ब्लॉक रचून तयार करण्यात आलेली ही घरे अत्यंत कमकुवत असून, यामुळे आता भोकरदन, हसनाबाद, राजूर मार्गे देऊळगाव राजा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून जास्त मोबदला मिळावा म्हणून कोणतीही परवानगी न घेता, केवळ काही तासांत शेकडो कच्चे गाळे आणि घरे उभी करण्यात आली आहेत. या घरांना ना पक्के खांब आहेत, ना योग्य पाया. या घरांवर छताच्या नावाखाली केवळ हलके लोखंडी पत्रे ठोकण्यात आले आहेत.
नुकत्याच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे या तथाकथित घरांवरील अनेक पत्रे उडाली असून, काही पत्रे धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. ही घरे भोकरदन - देऊळगाव राजा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी कडेला असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पुन्हा एकदा जोराचा वारा किंवा वादळ आले, तर हे धारदार आणि हलकी पत्रे त्याला लावलेल्या अँगलसह उडून थेट बाजूने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडू शकतात. महामार्गावरून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर हे पत्रे आदळल्यास भीषण अपघात होऊन निष्पाप प्रवाशांचा जीव जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
सिनेमाच्या सेटसारखी दिसणारी ही बनावट घरे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलिस आणि महसूल विभाग याकडे डोळेझाक का करत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासकीय निधी हडप करणाऱ्या अशा टोळ्यांवर गुन्हे दाखल करून, महामार्गावरील प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी हे धोकादायक पत्रे आणि भिंती तत्काळ हटवण्यात याव्यात, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.