

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील महावितरणच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बारसवाडा कृषी वीज वाहिनीला अडथळा करणाऱ्या झाडामुळे वीज पुरवठ्यात सातत्याने बिघाड होत होता. या पार्श्वभुमीवर बारसवाडा येथील २० ते २५ शेतकऱ्यांनी लोकसभागातून वडीगोद्री ते बारसवाडा या ६ किलोमीटर दरम्याडन वीज वाहिनीवरील अडथळा निर्माण करणारे झाडे तोडून वीजपुरवठा सुरळीत केला.
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सुरळीत वीजपुरवठा करणे ही मुख्य जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. उच्च व लघुदाब वीज वाहिनीला अडथळा निर्माण करणारी झाडे तोडणे आणि मान्सूनपूर्व कामे करणे ही मुख्य जबाबदारी महावितरण ची असते.
पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनीला अर्थ निर्माण करणारी झाडे तोडून झुकलेले विजेचे खांब सरळ करणे, लोंबकळणाऱ्या तारा व्यवस्थित करणे ही सर्व कामे मान्सूनपूर्व मेंटेनन्समध्ये निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार नियुक्त करून केले जाते. मात्र प्रत्यक्षात ही कामे झाली नसून कागदावर ती पूर्ण झाल्याचे दाखवून बिले उचलण्याचा प्रकार झाला असल्याने या भागातील शेतकऱ्यांना स्वतः लोकसहभागातून ही झाडी तोडावी लागत आहे.
चौकशी करा
जिल्ह्यात महावितरणच्या उच्च दाब व लघुदाब वीज वाहिन्यांच्या करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व करण्यात येणाऱ्या कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी. कामे न करता बिले उचलणाऱ्या ठेकेदारावर तसेच त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या महावितरण अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे.