

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील रोहिलागड फाटा पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या वापरातील एमएच २१ बीएफ ५२०० क्रमांकाच्या वाहनाचा सोमवार (दि. २० जुलै) रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता रोहिलागड फाट्यावरून बदनापूरकडे जात असताना अपघात झाला. या अपघातात आमदारांचे अंगरक्षक दत्तात्रय सवडे, भाजपा जालना जिल्हा सरचिटणीस अनिल कोलते तसेच वाहनचालक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरकडे रवाना झाला होता. दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्याच्या कुटुंबीयांना बदनापूर येथून घेण्यासाठी एक वाहन जामखेड फाट्यावरून बदनापूरच्या दिशेने पाठविण्यात आले होते. याच वाहनाचा जामखेड येथील रोहिलागड फाट्यावर अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातानंतर आमदार नारायण कुचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. अपघातात वाहनाच्या समोरील व पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जामखेड येथील रोहिलागड फाटा हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणांपैकी एक मानला जातो. तीव्र वळण, दिशादर्शक फलकांचा अभाव, गतीरोधक नसणे, अपुरे रिफ्लेक्टर आणि रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी एक-दोन दिवसांआड लहान-मोठे अपघात घडतात, तर अनेकांना यापूर्वी जीव गमवावा लागला आहे.
या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी अनेक वेळा वृत्तपत्रांमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले. गतिरोधक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, इशारा दिवे आदी सुविधा उभारण्याची मागणी वारंवार करण्यात आली; मात्र संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
कायमस्वरूपी सुरक्षा उपययोजना राबवा
विशेष म्हणजे, याच मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या वापरातील वाहनालाच या अपघातप्रवण ठिकाणी अपघात झाल्याने जामखेड येथील रोहिलागड फाट्यावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करणार का, याकडे जामखेड परिसरातील ग्रामस्थांसह संपूर्ण बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.